• KG Road, Akole, Tal. Akole, Dist-Ahmednagar
  • +91 9960609232

Adhala Secondary and Higher Secondary School Devthan

Phone Whasapp

श्री अगस्ति एजुकेशन सोसायटी,मुंबई,संचालित ...

अढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,देवठाण, ता. अकोले,जि.अहमदनगर

शैक्षणिक अहवाल सन २०२१-२२

“शब्दांची पूजाच करत नाही तर माणसांसाठी आरती गातो ,
ज्यांच्या गावात सूर्य नाही त्यांच्या हातात उजेड देतो !”

असे त्यांचे ध्येय होत जे नेहमी सांगत सद्गुण हा शुक्राच्या ताऱ्या प्रमाणे शांत व सदैव चमकत असतो,जे जे करील ते ते उत्कृष्टच करील असे धैर्य असुदे अशा श्री अगस्ति एजुकेशन सोसायटी चे संस्थापक सेक्रेटरी थोर स्वातंत्र्य सेनानी आदरणीय गुरुवर्य स्व.बा.ह.नाईकवाडी (सर) तथा “बाबा” यांच्या पवित्र स्मृतीस प्रथमत: विनम्र अभिवादन !


अढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालायचा सन २०२१-२२ चा शैक्षणिक अहवाल सादर करताना ज्यांनी मोलाचे सहकार्य केले ते माझे सहकारी पर्यवेक्षक,शिक्षक बंधु-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी,माता-पालक,शिक्षक-पालक संघ,शालेय समिती,देवठाण गाव,वाडी-वस्ती,आदिवासी बांधव,ज्ञात अज्ञात सर्वच हितचिंतक या सर्वांचे या निमित्ताने आभार मानतो.

इतिहासावर जगता येत नाही,इतिहास हा घडवावा लागतो.इतिहास घडविणारे माणस इतिहास विसरू शकत नाही.अढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अगदी त्याच पट्टीतील शिलेदारांच अढळाची मुहूर्तमेढ ज्या काळात रोवली गेली तो तर काळ खूपच खडतर तरी पण असंख्य आजी-माजी मुख्याध्यापक,गावातील जाणकार मंडळी यांच्या जिवावर अढळा धरण्याच्या कुशीत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक दैदीप्यमान अशी उतुंग इमारत उभी राहिली.



“स्व:तासाठी जरी काही करता आल नाही
तरी इतरांसाठी जगून बघाव
दुसऱ्याच्या डोळ्यातील आसव पुसताना
त्यात आपल प्रतिबिंब बघाव ”


अस आदर्शवत जीवन जगताना द्वंद समासाची जोडी स्व.गुरुवर्य बा.ह नाईकवाडी सर(संस्थापक सेक्रेटरी) आणि आमच्या मातृतुल्य आई दुर्गाबाई नाईकवाडी मॅडम(सेक्रेटरी),मा.सौ.शैलेजा पोखरकर मॅडम(अध्यक्षा) आणि कार्यवाहक श्री शिरिषजी,सतिषजी व संदिपजी नाईकवाडी सर यांचे अढळा वरती अढळ अस निरामय निस्सीम प्रेम राहिलय.त्याचच प्रतिबिंब आदिवासी वाड्या,वस्तीवरती शिक्षणाच्या रुपान बोलू लागल आणि बघता-बघता आठरापगड जातीची मूल शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली.


मन शांत प्रसन्न आणि उल्हासित ठेवण्याचे सामर्थ्य प्रार्थनेत असत.त्याला अंधश्रद्धेचा कोणताही स्पर्श नसतो.काळजातील अंधकार आणि चिंता प्रार्थनेने नाहीशा होतात.अंतर्मनापासून केलेली प्रार्थना अकल्पित आणि अनपेक्षित अशी मन शांती मिळून देते.अशा प्रसंगी सभोवतालच जग आणि आजूबाजूचा निसर्ग सुद्धा सुंदर वाटू लागतो.मार्च २०२० मध्ये आलेल कोव्हिड-१९ च संकट सर्वांसाठी वेगळच होत.परंतु माझा विद्यार्थी शिक्षण प्रवाहापासून वेगळा होणार नाही व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही या एकाच उदात्त हेतूने श्री अगस्ति एज्युकेशन सोसायटीने अकोले तालुक्यात प्रथमत:च ऑनलाइन झूम मीटिंग घेऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रांति साठी डिजिटल माध्यमातून अध्यापन-अध्ययन सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता इतर शाळांनी सुद्धा ऑनलाइन अध्यापन-अध्ययना ची सुरुवात केली.प्रयत्नवादि माणस कधीही अयशस्वी होत नाहीत.म्हणून गरुडाकडून पंख घ्या भरारी मारण्यासाठी,सूर्यकडुन तेज घ्या अंधाराच्या नाशासाठी,पर्वताकडून निश्चय घ्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी,फुलाकडून सुगंध घ्या दु:खात सुद्धा हसण्यासाठी,काटयांकडून धार घ्या अन्यायाच्या नाशासाठी,आभाळाकडून विशालता घ्या चुका माफ करण्यासाठी,वाऱ्याकडून वेग घ्या प्रगतिपथावर अग्रेसर होण्यासाठी व अढळा नदीकडून निश्चय घ्या अढळ मतावर ठाम राहण्यासाठी अशा अढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळा बंद पण शिक्षण सुरू होत. अस असल तरी जीव धोक्यात घालून असंख्य शिक्षक बांधवांनी ज्ञान दानाच पवित्र काम अविरत पणे पार पाडले.


यात परीक्षा विभाग- विविध शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा NMMS,NTS,नवोदय,सी व्ही रामन बालवैज्ञानिक परीक्षा,चित्रकला ग्रेड परीक्षा,इन्सपायर्ड अवॉर्ड तसेच इ ५ वी व ८ वी साठी शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विद्यार्थी बसवून त्यांना शाळा पातळीवर तसेच तज्ञ मार्गदर्शक द्वारे अचूक असे मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली जाते.त्याचप्रमाणे इ १० वी व इ १२ वी च्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शालेय अध्यापनाबरोबरच तज्ञ मार्गदर्शक कार्यशाळा आयोजित केली जाते.


वाङमय विभाग -विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांच्यामधील सुप्त गुणांचे प्रगटीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सह-शालेय उपक्रमात गायन,रांगोळी,निबंध,वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या जातात,थोर महिला-पुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या,शिक्षकदिन,शिक्षणदिन,वाचन प्रेरणा दिन,संविधान दिन,राष्ट्रीय मतदान दिन,मराठी भाषा दिन,जागतिक महिला दिन अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून सक्षम असा विद्यार्थी बनवण्याचे काम अविरतपणे चालू असते.


पंचायत समिती अंतर्गत -महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्या अंतर्गत होणारे विविध प्रशिक्षणे,शैक्षणिक कार्यशाळा तसेच विविध सेमिनार,वेबीनार मध्ये आपल्या विद्यालयाचे शिक्षक सहभाग नोंदवून विविध कौशल्ये प्राप्त करतात.


पर्यावरण पूरक गोष्टी – निसर्गाचा समतोल राखण्याचा तसेच विद्यार्थ्यांमध्ये निसर्गविषयी अतूट नात निर्माण करण्यासाठी क्षेत्रभेट,शैक्षणिक सहल,वृक्षारोपण,मूर्ती बनविणे,मातीची भांडी बनविणे,किल्ले बनविणे इत्यादि उपक्रम राबविण्याचा प्रयत्न चालू असतो.


भौतिक सुख-सुविधा अंतर्गत – भव्य व प्रशस्त इमारत,अटल टिंकरिंग लॅब,अध्यावत विज्ञान प्रयोगशाळा,सुसज्ज आय.सी.टी लॅब तसेच पुरेसे ग्रंथालय उपलब्ध असून याचा विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित शिक्षक वृंदाद्वारे उपयोग केला जातो.



१. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी अतिशय कमी खर्चात जात प्रमाणपत्र काढणे संदर्भात कॅम्प चे आयोजन करण्यात आले(सहकार्य:ग्रामपंचायत देवठाण)
२. किशोरवयीन मुलींच्या समस्या निराकरन करणे कामी कार्यशाळेचे आयोजन
३. शिक्षक,पालक,माता सहविचार सभेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना अंमलात आणणे.
४. शालेय व्यवस्थापन व विकास समितीला विश्वासात घेऊन,सुसंवाद साधून शाळेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे.
५. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र देवठाण,ग्रामपंचायत कार्यालय व अढळा विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १५ वर्ष वयोगट आणि १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोव्हीशिल्ड/कोवॅक्सीन लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली.


खूप काही करायचय,घडवायच,प्रगतिशील बनायच ध्येय मनाशी बाळगून अढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची वाटचाल सुरू आहे.भारतीय तत्वज्ञानानुसार अस्तित्वाच्या त्रिकोणाच्या पायाच्या एका टोकाला पायाभूत सुविधा व समृद्धी देणारी लक्ष्मी,दुसऱ्या टोकाला शक्ति व संरक्षण देणारी माहकाली दुर्गा आणि त्रिकोणाच्या शिरोबिंदूनमद्धे ज्ञान,कल्पना देणारी महासरस्वती असते.अशा माहकाली,महालक्ष्मी,महासरस्वती यांना वंदन करतो आणि बहिनाबाईच्या भाषेत –


“जग...जग...माझ्या जीवा असं जगनं तोलाच,
उच्च गगणासारख धरित्रीच्या ग मोलाच”


धन्यवाद...!
मुख्याध्यापक (अढळा विद्यालय)